सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

दुधाचा महापूर (1)
भारतात कोल्हापूर गूळ, चप्पल, साज, मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा, मटण, खानदानीपणा, भाषा, पैलवानी पेक्षा अशा अनेक कारणांनी प्रसिध्द आहे. तसेच ते दुधाबद्दल आणि दूधकट्टय़ाबद्दलही प्रसिध्द आहे. कोल्हापूरला कुस्ती खूप. पैलवानांना राजाश्रय मिळायचा. त्यामुळं भरपूर व्यायाम, भरपूर कुस्ती, भरपूर खुराक आणि भरपूर दूध. आता हे दूध मिळायचं कुठं? तर दूधकट्टय़ावर. सार्‍या कोल्हापुरातल्या म्हैशी गंगावेश, मिरजकर तिकटी, रंकाळावेश आदी ठिकाणी यायच्या आणि गवळी लोकांचा खास कोल्हापुरी ढंगाचा पुकारा व्हायचा. चवडय़ावर बसून डोळ्यादेखत चरवी भरून काढलेलं धारोष्ण दूध पैलवानच नव्हे तर बालकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सारं कोल्हापूरच उभे राहून गटागटा प्यायचे. आजही असं धारोष्ण आकडी दूध पिणारी माणसं कोल्हापुरात आहेत आणि दूधकट्टाही आहे. शहरात इतरत्र देखील सार्वजनिक ठिकाणी अशा पध्दतीने दूध आजही मिळतं. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री 1 पर्यंत हा दूधकट्टा चालूच असतो. प्रामुख्याने सायंकाळी हा दूध पुरवठा जास्त होतो.