सौजन्य संदर्भ - "नांदी पर्यावरण समृद्धतेची" कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन - उदय कुलकर्णी, संपर्क - कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६ ००३.


कोल्हापूर शहरामध्ये नव्याने अनेक बांधकामे होत आहेत. तसेच जुन्या कोल्हापूरमधील इमारतींचे स्वरूप पालटण्यावरही भर दिला जात आहे. जुने वाडे काळाच्या उदरात गडप होऊन अरुंद जागांमध्ये नव्याने बांधकाम होत आहे. जागेचा जास्तीत जास्त व्यापारी उपयोग करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. तथापि हे सर्व बदल होत असताना योग्य काळजी घेतली नाही, तर हे बदल अपघातांना निमंत्रण देणारे ठरू शकतात. तसेच अतिवृष्टी, महापूर, भूकंप यासारख्या आपत्तींमध्येही टोकाची कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कोल्हापुरातील न्यायालयाची इमारत, टाऊन हॉल, सी.पी.आर.ची इमारत, शाहू जन्मठिकाण या जागा कधी पुराच्या पाण्यात बुडाल्या नाहीत. अत्यंत गांभीर्याने ही बाब त्याकाळी बांधकामापूर्वी विचारत घेतली असणार आहे. जुन्या इमारती, कमानी, कुस्त्याचे मैदान, नगारखाना इमारत, धुण्याच्या चाव्या, वाडे, पाण्याचा खजिना, करवीरनगर वाचनमंदीराची इमारत अशा अनेक वास्तू स्थापत्य शास्त्रातील आदर्श नमुने आहेत. पण त्याचा विसर पडला असून त्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, जाहिरात फलक आणि शेजारी नव्याने उभारलेल्या इमारती ह्या बाबी विजोड ठरतात. कोल्हापूर बदलताना त्याचा चेहरा आणि बाज तसाच ठेवण्याचा विचार झाला पाहिजे.