सौजन्य संदर्भ - "नांदी पर्यावरण समृद्धतेची" कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन - उदय कुलकर्णी, संपर्क - कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६ ००३.


करवीर नगरीतील वृक्षसंपदा कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारी आहे. शहर परिसरात अनेक महत्त्वाचे, दुर्मिळ, औषधी
देशी-विदेशी वृक्ष आहेत. ही बहुमूल्य वृक्षसंपदा महत्त्वाची असूनही दुर्लक्षित आहे. शहर परिसरात सुमारे ६० बागा-
उद्याने आहेत. त्यातील बहुतांशी बागा महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत, तर काही राज्य शासनाच्या उद्यान विभागाकडे
आहेत. या सर्व उद्यानात, खाजगी जागेत, रस्त्याच्या कडेने तसेच पडिक जागेत, शेतवाडीत विविध प्रकारचे वृक्ष आहेत.
महापालिकेने वृक्षसर्वेक्षण, वृक्षगणना यासारखे उपक्रम सक्षमपणे राबविलेले नसल्याने नेमके वृक्षांचे प्रकार, त्यांच्यातील
विविधता, नेमकी संख्या, औषधी दुर्मिळ अशा वृक्षांचे वर्गीकरण, वृक्षांची शास्त्रीय सूची आदी बाबींची नोंद
महानगरपालिकेकडे समाधानकारक स्वरुपात उपलब्ध नाही.

निसर्गमित्र व अन्य पर्यावरणप्रेमी संस्थांनी शहरात जे सर्वेक्षण केले त्यामध्ये सुमारे १६० प्रकारचे वृक्ष कोल्हापूर शहराच्या
परिसरात आढळले आहेत. बेंगॉल नटसारखे काही वृक्ष गेल्या पाच-दहा वर्षात नष्टच झाले आहेत. पॅचीरा, ब्राझील नट,
ऑस्ट्रेलियन चेस्टनट, क्विन्सलँड नट, क्रायसोफायलम, क्लेन व्होव्हीया, बकूळ, बालसम ट्री, लव्हेंडर ट्री, यांग यांग ट्री,
तिवर, सुरंगी, मुचकुंद, उंडी, सुकाणू, कदंब, अजान वृक्ष, हनुमान फळ, कोलव्हलिया यासारख्या देशी-विदेशी दुर्मिळ
वृक्षजाती कोल्हापूर शहर परिसरात आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व योग्य पुनरूत्त्पादनासाठी जाणिवपूर्वक प्रयत्नांची गरज
आहे.

शहरातील बागा - ४७ ट्रॅफिक आयलंड - ३६, प्रस्तावित बागा - ९.
या बागामध्ये ३०.५ हेक्टर इतके क्षेत्र व्यापले असून त्याचे शहराच्या क्षेत्रफळाशी प्रमाण नगण्य आहे.
इ. स. १९७६ पासून इ. स. २००२ अखेर कोल्हापूर शहरात लागवड केलेल्या झाडांची संख्या :
लागवड केलेल्या झाडांची संख्या २, १७, ०२०
जगलेल्या झाडांची संख्या १, २५, २४०
झाडे जगण्याची टक्केवारी ५७%
इ. स. २००२ नंतर कोल्हापूर शहरात वृक्षलागवड करण्यात आलेली नाही.