सौजन्य संदर्भ - "नांदी पर्यावरण समृद्धतेची" कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन - उदय कुलकर्णी, संपर्क - कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६ ००३.


सात आंधळे हत्ती पाहायला गेले. कोणाला हत्तीची शेपूट हातात मिळाली, कोणी हत्तीचा पाय कवेत
घेतला, तर कोणाच्या हाताला हत्तीच्या सोंडेचा स्पर्श झाला. ज्याच्या हाताला हत्तीच्या शरीराच्या ज्या
भागाचा स्पर्श झाला, त्याला हत्तीच्या शरीराचा केवळ तो भाग म्हणजेच हत्ती असे वाटले !

पर्यावरण व विकास या दोन्ही संकल्पनांबाबत डोळस माणसांची स्थितीदेखील कथेतील आंधळयांप्रमाणे
आहे. विकासविषयक समग्र दृष्टीकोनाचा अभाव आणि व्यक्तिगत आर्थिक विकास आधी की नैसर्गिक
साधनस्त्रोतांच्या समृद्धीसह दीर्घकालीन सामाजिक विकास आधी याबाबत मनामध्ये असणारा संभ्रम यातून
पर्यावरणरक्षण व संवर्धन आणि विकास या परस्परविरोधी बाबी असल्याची धारणा दृढ झाली आहे. याच
द्वंद्वातून नैसर्गिक साधनस्त्रोतांची बरबादी करीत आर्थिक विकासाचे सोपान चढण्याची वेडी स्पर्धा सुरु झाली.
चंगळवादी जीवनशैलीतील उपभोगांसाठी हातात भरपूर पैसे खेळत राहणे महत्त्वाचे बनले. पाणी शुद्ध राहिले
नाही तर बाटलीबंद पाणी पिऊ, पक्षी राहिले नाहीत तर त्यांच्याजागी भरपूर पैसे खर्च करून हुबेहूब
पक्ष्यांसारखे दिसणारे चित्र किंवा पुतळे लावू अशी वृत्ती वाढीला लागली. आता ग्लोबल वॉर्मिंग सारखे
संकट जाणवू लागल्यानंतर मात्र तथाकथित विकास वाद्यांची झोप उडाली आहे. या पर्यावरणीय संकटाचा
मुकाबला कसा करायचा याबाबत जगभर विचारविनिमय सुरु आहे. धोरणे आखली जात आहेत. ज्याला
आपण विकास म्हणत होतो तो खरोखरी विकास आहे की विनाशाला निमंत्रण देणारा विकास आहे यावर
नव्याने विचार करण्याची गरज विकास वाद्यांनादेखील भासू लागली आहे.

कोल्हापूर शहरापुरते बोलायचे तर इ. स. १९८० च्या दशकापूर्वी पर्यावरण हा शब्ददेखील कोल्हापुरातील
सामान्य नागरीकाच्या कानावरून गेला नव्हता, पण म्हणून पर्यावरणातील बदल जिथल्या तिथे थांबले होते
असे नव्हे. पर्यावरणीय बदलांची गती काहीशी संथ होती इतकेच! - पण तलावांचे रूप पालटतच होते. नदी
प्रदूषित होतच होती. जैवविविधतेला धोका पोहचत होता. सरासरी तापमानात वाढ होत होती. या साऱ्या
बदलांनी एक टोक गाठायला सुरूवात केली. पर्यावरणाचे प्रश्न आणि विकासाचे प्रश्न यांची परस्परातील
गुंफण जाणवू लागली. विज्ञान प्रबोधिनी, ग्रीन गार्डस्, रंकाळा संरक्षण व संवर्धन आंदोलन, निसर्ग मित्र,
हिलरायडर्स, दि एन्व्हायर्नमेंटल असोसिएशन, टीक नेचर क्लब , देवराई, विश्व प्रकृती निधी यासारख्या
संस्था-संघटना आपापल्यापरीने एक एक विषय हाताळत होत्या. जनस्वास्थ्य दक्षता समिती आरोग्याचे प्रश्न
हाताळत होती. फेरीवाल्यांची संघटना फेरीवाल्यांचे, वाहतूकदारांची संघटना वाहतूकदारांचे तर महिला
संघटना महिलांचे प्रश्न हाताळत होत्या. हळू हळू पर्यावरणीय प्रश्न आणि शहर विकास यांचा हत्ती एकत्र
येऊन संपूर्ण पाहण्याची आवश्यकता स्पष्ट झाली. तेवीस संस्था-संघटनांनी एकत्र येऊन कोल्हापूर
शहरासाठी नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा तयार करण्याचा संकल्प सोडला.