कोल्हापुरी साज

कोल्हापुरात पेठा अनेक आहेत! आठवड्यातील प्रत्येक वाराच्या नावात! प्रत्येक पेठेचं काही वैशिष्ट्य! पण दागिन्याची बाजारपेठ म्हटलं की ओठावर नाव येतं ते गुजरी म्हणजे सराफकट्टा! ख्यातनाम कविवर्य ग. दि. तथा आण्णा माडगूळकर यांचं कोल्हापूरातील वास्तव्य जुन्या मंडळींना माहित आहे. अण्णांची एक लावणी `सोनारानं टोचलं कान' चित्रपटात आहे. शब्द आहेत, `एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापूरी साज!' या लावणीत पुढे त्यांनी गुजरीचाही उल्लेख केला आहे. ज्यांना दागिन्यांची हौस आहे त्यांना कोल्हापुरी साज म्हणजे एक अनमोल लेणं वाटतं. माडगुळकरांची लावणी हेच सांगून जाते.
कोल्हापुरी साजाचा पत्रा अतिशय पातळ आणि नाजूकही असतो. बारा पानांच्या या साजातील प्रत्येक पानावर श्रीकृष्णाचा अवतार कोरलेला असतो. साहजिकच बारा पानावर बारा अवतार कोरलेले असतात. पानाच्या बाजूला असलेल्या मण्यातून सोन्याचा दोरा ओवलेला असतो. अतिशय आकर्षक व मोहक दिसणारा एक कोल्हापुरी साज तयार करण्यासाठी आठ ते दहा कारागिरांना काळजीपूर्वक काम करावे लागते.
साऱ्या भारतात प्रसिध्द असणाऱ्या आपल्या कोल्हापुरी साजाला पाश्चिमात्य देशातही खूप मागणी आहे. चांगला कोल्हापुरी साज तयार करण्यासाठी किमान १५ ग्रॅम सोने आवश्यक असते. जसजसे सोन्याचे प्रमाण वाढेल तसतसा त्याचा दर्जाही वाढतो. सोन्याच्या वाढत्या भावामुळे सध्या कोल्हापुरी साज चांदीचे बनविले जातात. आणि त्यावर सोन्याचा मुलामा दिला जातो. त्यामुळे अशा कोल्हापुरी साजांची किंमत सर्वांना परवडणारी असते. आणखी एक फायदा की सोन्याचा मुलामा कमी झाला की तो पुन्हा देता येतो. कमी किमतीत हौस पुरविण्याचा आनंदही मिळतो.
कोल्हापुरी साजाबरोबरच मोहनमाळ म्हणजे कोल्हापूरचे वैशिष्ट्य! सोन्याचा पातळ पत्रा काढायचा. त्याचे तुकडे खोबरेल तेलाच्या उष्णतेवर गोल फुगवून मणी तयार करायचे! एका मण्यासाठी दोन तुकडे हे प्रमाण. एक तोळा सोन्यापासून साधारणत: अडीचशे मणी तयार होतात. ही कला केवळ कोल्हापूरच्याच कारागिरांना अवगत आहे. मोहनमाळेशिवाय कोल्हापूरचा लक्ष्मीहार, पोहेहार, चपलाहार हे सोन्याचे दागिनेही प्रसिध्द आहेत.

चांदी नगरी हुपरी :
सोन्याबरोबरच चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती पूजेचे साहित्य याबद्दल कोल्हापूरचे चांदी कलाकार प्रसिध्द आहेत. हे कलाकार सारे काम हाताने करतात. चांदीकाम म्हटलं की कोल्हापूरजवळच `हुपरी' हे गाव समोर येतं. चांदीच्या दागिन्यांसाठी भारतात हुपरी प्रसिध्द आहे. कडदोरे, साखळया, तोरड्या आणि पैंजण इत्यादी चांदीचे नाजूक दागिने. साऱ्यांना मोहून टाकणारे, कोल्हापूरात किंवा अन्य ठिकाणचे व्यापारी इथल्या कारागिरांकडे विश्वासाने चोख चांदी देतात. त्यापासून व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे दागिने तयार करुन दिले जातात. कृष्णा सोनार यांनी चांदीचे मोहक दागिने बनविण्याच्या कलेची मुहूर्तमेढ शंभर वर्षापूर्वी हुपरीत रोवली. बघता बघता हुपरीतील प्रत्येक घरात हा व्यवसाय सुरु झाला. साधारणत: ३५ हजार लोकवस्तीचे हे गाव. पण महाराष्ट्नच्या नकाशावर हुपरीचे नाव प्रामुख्याने झळकू लागले आहे.
हुपरीत चांदी कारखानदार असोसिएशन श्री. यशवंतराव नाईक आणि सहकाऱ्यांनी स्थापन केली. जिचे आज सुमारे १२०० सभासद आहेत. पदव्यूत्तर शिक्षण घेतलेली अनेक मंडळी या व्यवसायात कार्यरत आहेत. व्यापारी आणि कामगार यांच्यातील विश्वासावर हुपरीत चालणारा चांदी व्यवसाय वैशिष्ट्यपूर्णच म्हणावा लागेल.
कोल्हापूरच्या गुजरी सराफपेठेत जश्या अनेक पेठा पिढ्यान पिढ्या काम करतात तसा हुपरीतही आढळतात.
कोल्हापूरात श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणारी मंडळे कोल्हापूरी साज खरेदी करतात. हुपरीलाही भेट देतात कारण त्यामागे असते या दागिन्यांची मोहकता आणि कोल्हापूरची परंपरा.