कोल्हापुरी चप्पल

पादत्राणांची दुनिया! इथं अनेक कंपन्यांनी नाव कमावलं. प्रचंड जाहिरातबाजी करुन या कंपन्या आपल्या मालाला बाजारपेठ मिळविण्याकरिता धडपडतात. परंतु प्रसिध्दीपासून दूर राहिलेली तरीही आंतरराष्ट्नीय बाजारपेठेत स्वत:चा लौकिक टिकवून राहिलेलं पादत्राण म्हणजे आपलं कोल्हापूरी चप्पल!
माणसानं जे काही शोध लावलं त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा. पायाला बोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायालापाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व काळात पादत्राणेवापरली जात. नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई.
भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचं साम्य आढळतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापूरी चप्पलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळ जवळ नाहीसा झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापूरी चप्पल मात्र टिकून आहेत. कोल्हापूरी चप्पलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापूरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी, गांधीवादी अशी नावे अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापूरी चपलाने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.
कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयातसुध्दा थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही. कारण त्या पुर्णत: हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: सात हजाराचे वर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते.
सध्या मात्र या व्यवसायात चामड्यांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे कोल्हापूरी चप्पलांच्या निर्मितीच्या प्रमाणात घट होत आहे. चामड्याच्या वाढत्या किंमती हेही कारण आहे. याही परिस्थितीत कोल्हापुरी पुडा, कोल्हापुरी फ्लॅट, वेणी चपलांना शहरी भागात तर कापशी चपलांना ग्रामीण भागात मागणी आहे. घडीच्या कोल्हापुरी चपलांना परदेशी खूपच मागणी आहे.
स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटली या देशात कोल्हापूरी चपलांची प्रदर्शने भरविली जातात. त्यासाठी इथल्या उद्योजकांना निमंत्रणे येतात. कातडी कमावण्याच्या व्यवसायात कोरियाचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
कोल्हापूरला आलेली पाहुणे मंडळी कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत हे जरी खरे असले तरी सद्य परिस्थितीत कातड्याची टंचाई जाणवत असल्याने कामगार वर्गावर कठीण परिस्थिती आल्याचे जाणवते. जिल्हा चर्मोद्योग संघाचे कार्यकर्ते या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. चर्मोद्योग महामंडळाने प्रयत्न करणे जरुरीचे आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलेच्या निर्मितीला पुन्हा चांगले दिवस येतील.