प्राचीन कोल्हापूर
कोल्हापूर शहराची प्रथम वसाहत पंचगंगा (अर्वाचीन कालातील नाव) नदीच्या काठावर एका टेकडीवर वसविली गेली. ही टेकडी म्हणजेच ब्रह्मपुरी होय. या जागेची निवड पाण्याची सोय, शेती त्याचबरोबर शत्रूच्या चालीची टेहाळणी करता यावी या तिन्ही उद्देशाने केलेली होती. पुराच्या पाण्यापासून संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ही वसाहत टेकडीवर वसविताना त्यांनी विचारात घेतलेला दिसतो. ब्रह्मपुरी हे नाव सुरूवातीपासून नव्हते. आर्यांच्या आगमनानंतर हे नाव मिळाले असावे. या विभागात प्राचीनकाळी मुख्यत: ब्राह्मण वस्ती जास्त असल्यामुळे याला ब्रह्मपुरी असे नाव पडले असावे. या नावाविषयी अशी एक दंतकथा आहे की हे गाव कसे वसविले गेले याची माहिती नसल्यामुळे स्वत: ब्रह्मदेवाने ते निर्माण केले अशी आख्यायिका प्रसृत होऊन त्याला ब्रह्मपुरी हे नाव रूढ झाले.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ब्रह्मपुरी ही एक राजधानी अगर मोठे शहर होते. इ.स.१०६ ते १३० च्या दरम्यान हे शहर नदीच्या काठावर विटांच्या सुंदर घरांनी परिपूर्ण होते. त्या काळात दक्षिणेला सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी वा शातवाहनांचे राज्य होते. व्यापार व संस्कृतीच्या दृष्टीने या शहराचा रोमन जगाशी चांगला संबंध होता. रोमहून आणलेल्या वस्तू, नाणी, व ब्रंाझ धातूची भांडी इत्यादीचे अनुकरण मातीमध्ये केलेल्याचे आढळते. हे शहर बहुधा श्री यज्ञ शातकर्णी याच्या कारकीर्दीत आगीने उध्वस्त झाले असावे. बह्मपुरीच्या ऐश्वर्याला इसवीसनाच्या दुसऱ्या शतकानंतर ओहोटी लागली आणि दुदैवाने ब्रम्हपुरीचे गेलेले ऐश्वर्य पुन्हा परत आलेच नाही. कारण ब्रम्हपुरीच्या नाशानंतर काही कालांतराने श्री महालक्ष्मीचे देवालय स्थापन झाले आणि कोल्हापूर शहराची वाढ श्री महालक्ष्मीचे देवालय केंद्र बनून त्याच्या सभोवताली झाली.
कालानुक्रमे विचार करता ब्रम्हपुरीनंतर उत्तरेश्वराच्या विचार केला जातो. ब्रम्हपुरी ही अधिक सोयीची जागा वसाहतीने व्यापल्यानंतर कमी सोयीच्या ठिकाणी म्हणजे नदीपासून थोड्या अंतरावर ब्रम्हपुरीपेक्षा कमी उंचीच्या टेकडीवर वसाहत झाली. हीच उत्तरेश्वराची वसाहत. ब्रम्हपुरी प्रमाणेच इथेही उत्खननात जुने अवशेष सापडतात. परंतु सध्या तिथे लोकवस्ती खूपच दाट झाल्यामुळे उत्खनन अशक्य झाले. उत्तरेश्वर या नावासंबंधी काही माहिती उपलब्ध नाही. ज्या देवालयाला हल्ली उत्तरेश्वर म्हणून दाखविले जाते ते शंकराचे देवालय आहे. त्यामधील शंकराची पिंड सुमारे चार माणसांच्या कवेत मावेल इतकी मोठी आहे. हे देवालय केव्हा बांधले गेले य संबंधी देखील काही माहिती उपलब्ध नाही. उत्तरेश्वराच्या दक्षिणेला श्री महालक्ष्मीचे देवालय वगैरे भागात लोकवस्ती झाल्यानंतर त्यांनी उत्तरेकडील देव यावरून उत्तरेश्वर हे नाव रूढ केले असावे.
ब्रम्हपुरी व उत्तरेश्वर या प्रमाणेच खोल खंडोबा ही देखील एक टेकडीच आहे. ब्रम्हपुरीपेक्षाही तिची उंची थोडी अधिक आहे. येथील वसाहत वरील दोन्ही वसाहतीनंतर झाली असावी कारण येथे सोयी कमी असून हे ठिकाण नदीपासून दूर आहे. खोल खंडोबा हे एक जुने देऊळ आहे. त्याचा आकार बाहेरून मशिदीसारखा दिसतो, कारण त्यावर मुसलमानी पद्धतीचर घुमट आहे. शिवाय हा देव बसविलेली जागा जमिनीच्या पातळीच्या खाली आहे. म्हणूनच याला खोल खंडोबा असे म्हणतात. या देवालयाचा आकार मशिदीसारखा का असावा या संबंधी विचार करता दोन अंदाज बांधता येतील. एक म्हणजे मुसलमानंाच्या स्वाऱ्या झाल्यास त्यांच्या हिंदू देवांच्या मूर्तिभंजक प्रवृत्तीपासून संरक्षण म्हणून देवालयाचा बाहेरचा आकार मशिदीसारखा केल्याल्यास ते तिकडे फिरकणार नाहीत. परंतु असे आढळून येते की या भागात इतरही अनेक देवालये असून त्यांचा बाह्य आकार मशिदीसारखा नाही फक्त एकच देवालय तसे बांधण्याचे काहीच प्रयोजन नाही. म्हणून हा अंदाज तितकासा योग्य वाटत नाही. दुसरा अंदाज असा की या देवालयाचे बांधकाम कुणीतरी मुसलमान कारागीराने केले असावे, आणि हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्यामुळे याला कुणीही विरोध दर्शविला नसावा आणि हा अंदाज पटण्यास काही हरकत नाही. कारण याच्या पुष्ट्यर्थ आणखी दोन उदाहरणे पहावयास मिळतात. ती म्हणजे बाबूजमाल या मशिदीच्या चौकटीवर श्री गणेशाचे चित्र व पन्हाळगडावरील एका द्वाराच्या चौकटीवर कोरलेल्या गणेशाच्या डोक्यावरील मुसलमानी पद्धतीची टोपी. यावरून कोल्हापूरात हिंदू मुसलमान ऐक्य फार पूर्वीपासून आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.

खोल खंडोबा हे नाव देण्याचे कारण प्राचीन वस्ती नाश झाल्यामुळे आजूबाजूची घरे पडून उंचवटे निर्माण झाले आणि एकेकाळी जमिनीवर असलेला देव जमिनीच्या पातळीखाली गेला व लोकांनी त्याला न हलविता तसेच देऊळ बांधले आणि आजूबाजूची जमीन न उकरता उंचवटयावर पुन्हा वस्ती केली. या ठिकाणी देखील जुने अवशेष सापडतात पण उत्तरेश्वराप्रमाणेच इथेही सध्या दाट लोकवस्ती झाल्याने उत्खनन करणे अशक्य झाले आहे. जुन्या कागदपत्रात या भागाला केसापूर असे संबोधिलेले आढळते. परंतू हे नाव रूढ झालेले दिसत नाही.
ब्रम्हपुरीची वाढ होऊन ती नाश झाली तरी उत्तरेश्वर व खोल खंडोबा यांची वाढ मंदगतीने सुरू होती. त्यांची फार मोठी वाढ झाली नाही व नाशही झाला नाही. वरील तीनही नैसर्गिक केंद्रे स्थापन झाली व त्यांनतर रंकाळा, पद्माळा व रावणेश्वर ही तळयाजवळील केंद्रे निर्माण झाली.

रंकाळा केंद्र
रंकाळा केंद्र हे यापैकी सर्वांत जुने असावे. या ठिकाणी संध्यामठ ही सुंदर इमारत व नंदीचे देवालय प्राचीन काळी बांधले गेले. हा नंदी प्रतीवर्षी एक गहू पुढे सरकतो व तो सरकत सरकत रंकाळयात पडल्यावर प्रलय होणार अशी एक दंतकथा आहे. या देवालयातील नंदी सुमारे ५.५ फूट उंचीचा आहे. वरील दंतकथेची वस्तुस्थिती अशी की, आठव्या किंवा नवव्या शतकात जो मोठा भूकंप झाला व ज्यामुळे रंकाळा तलाव निर्माण झाला त्याचवेळी या देवालयातील नंदी(ज्याला पाय नाहीत असा) धरणीकंपामुळे पुढे सरकला असावा.ही गोष्ट लवकर लक्षात न आल्यामुळे कालांतराने वर लिहिलेली दंतकथा प्रसृत झाली असावी. या मंदिराचा अलिकडेच म्हणजे सन १९६९ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मुख्य नंदीचे देवालय पुन्हा बांधले असून देवळासमोर असलेल्या पुरातन शिवपिंडीवर मंडप बांधण्यात आला आहे.
पद्माळा केंद्र
हे एक समकालीन खेडे होते. जुन्या कागदपत्रात याचा उल्लेख नवे जिजापूर असा आढळतो. या खेडयाला स्वतंत्र महारवाडा नव्हता. फिरंगाईच्याच महारवाड्याचा या वस्तीला उपयोग होत असावा. येथे जुने अवशेष सापडत नाहीत.
रावणेश्वर केंद्र
ही देखील एक स्वतंत्र व जुनी वसाहत आहे. या खेड्याचा स्वतंत्र असा महारवाडा हलविला गेला आणि जवळील महार तळे बुजविले जाऊन सध्या तेथे राजाराम कॉलेज (सायन्स विभाग), राजाराम (अयोध्या) टॉकिज, आईसाहेब महाराज यांचा पुतळा, शाहू टॉकीज, सध्याची स्टेट बँक इमारत अशा इमारती उठल्या आहेत. या भागाला रविवार पेठ असे नाव आहे. तत्पूर्वी त्याचे नाव हिरापूर असे होते. पद्माळयाप्रमाणे येथेही जुने अवशेष सापडत नाहीत. पद्माळा व रावणेश्वर हे दोन तलाव होते. ते बुजवून अनुक्रमे सध्या गाधी मैदान (किंवा वरूणतीर्थ वेस मैदान) व श्री शाहू स्टेडियममध्ये रूपांतर करण्यात आले.
ज्याप्रमाणे नदीकाठाच्या तीन केंद्रांचा एक विभाग मानणे शक्य आहे त्याचप्रमाणे तळयाकाठच्या या तीनही केंद्रांचा स्वतंत्र विभाग मानला जातो. इसवीसनाच्या ९व्या शतकाच्या सुमारास ही सहाही केंद्रे लहान खेड्यांच्या स्वरूपात स्वतंत्रपणे अस्तित्वात होती.