अर्वाचीन कोल्हापूर

अर्वाचीन काळातील कोल्हापूराची सुरूवात इ.स. १८४४-४८ पासून झाली. इ.स. १८४४ मध्ये ब्रिटीश सरकारने कोल्हापूर शहराच्या संस्थानचा कारभार आपल्या हाती घेतला आणि तो पाहण्याकरिता मेजर ग्रॅहम यांची नेमणूक केली. इ.स. १८४५-८ च्या दरम्यान रेसिडेंसीच्या इमारती बांधल्या गेल्या. कोल्हापूरला ब्रिटीश सरकारचा जो प्रतिनिधी असे त्याला सुरूवातीस पोलिटिकल सुपरिटेंडेंट असे नाव देण्यात आले व शेवटी रेसिडेंट असे नामाधिकरण करण्यात आले. अशा रीतीने कोल्हापूर शहराच्या इतिहासात एक नवीन राजकीय केंद्र निर्माण झाले. रेसिडेंसीकरिता निवडलेल्या जागेवर ब्रिटिशांचा प्रत्यक्ष अंमल होता. या जागेत कलेक्टर, जिल्हा न्यायाधिश व पोलिस अधिकारी यांचे बंगले, पोलिस हेड पॅटर, रेसिडेंसी क्लब, जिल्हा इंजिनियर यांची कचेरी इत्यादी इमारती व त्यालगतच्या ताराबाई पार्क पर्यंतचा सर्व भाग यांचा समावेश होता. प्रथमत: कोल्हापूरला लष्कर होते आणि त्यामुळे त्यावेळची रेसिडेंसी हद्द फारच मोठी होती. नंतर लष्कर हालविल्यावर हद्द थोडी कमी करण्यात आली. रेसिडेंन्सी स्थापनेनंतर अंदाजे शंभर वर्षानंतर १५ ऑगस्ट १९४७ साली ह्या सर्व हद्दीवर पुन्हा संस्थानांचा अधिकार निर्माण झाला.

रेसिडेंसीमुळे १८४४ नंतर कोल्हापूरचे राजकीय केंद्र महालक्ष्मी देवालयापासून दूर असे एक स्वतंत्र केंद्र निर्माण झाले. तत्पूर्वी असलेली धार्मिक व राजकीय युती रेसिडेंसीमुळे मोडली गेली. इ.स. १८७७-८४ च्या काळात रेसिडेंसीजवळच नवा राजवाडा बांधला गेला व महाराज तेथे राहू लागले. तेव्हापासून तर ते संपूर्णतया राजकीय केंद्र व देवालय हे फक्त धार्मिक केंद्र अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा महाराजांना वाटले की राजवाडा देवालयाशेजारीच असावा. १८७७ साली नवा राजवाडा बांधण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी लोकांना वाटले की छत्रपतींचा वाडा रेसिडेंसीच्या वाड्याजवळ असावा.
रेसिडेंसीच्या परिणाम म्हणून सभोवताली विशिष्ट प्रकारची वसाहत निर्माण झाली. इतर सरकारी कचेऱ्या अधिकाऱ्यांचे बंगले, मिशनऱ्यांच्या संस्था, श्रीमंत व्यापारी व जमीनदार, पेन्शनर अधिकारी इत्यदींच्या या वसाहतीत समावेश होत असे. त्याचबरोबर नव्या राजवाड्यात महाराज रहायला आल्याबरोबर इतर जहागिरदार, उमराव मंडळीही आली. एक चर्चही उभारले गेले. पुढे ताराबाई पार्क स्थापन झाले आणि लवकरच रेसिडेंसीच्या सभोवती एक सुंदर उपनगर स्थापन झाले.

रेसिडेंसीचा आणखी एक परिणाम म्हणजे कोल्हापूर हे दळणवळणाचे मोठे केंद्र बनले. पुणे व बेंगलोर ही मुख्य लष्करी ठिकाणे जोडताना इतर लहान लष्करी केंद्राबरोबरच कोल्हापूरवरून हा रस्ता केला गेला. या प्रमाणे समुद्राकडे जाण्यासाठी आंबा घाट फोडून कोल्हापूर रत्नागिरी हा रस्ता केला गेला. या रेसिडेंसीचा संबंध असलेली सांगली व मिरज ही शहरे जोडणारा रस्ताही झाला. कोल्हापूर हे प्रत्येक पेठेला व जहागिरीला जोडलेले असल्यामुळे पन्हाळा, बावडा, राधानगरी, गारगोटी, इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा इत्यादी गावांशी रस्त्याने जोडले गेले. अनेक पूल बांधण्यात आले. चिकोडी रोड-फोंडा रस्त्यामुळे कोल्हापूर हे सावंतवाडी, विजयदुर्ग व मालवण या भागास जोडले गेले. शेवटी १८९१-९२ ला मिरजेहून कोल्हापूर रेल्वे लाईन टाकण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर हे एक मोठे दळणवळाचे केंद्र बनले. आंबा फोंडा घाट फोडल्यामुळे कोल्हापूरला जवळ-जवळ कोकणाचे दार म्हणण्याइतपत महत्व आले.

इ.स. १८४४ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अधिकार सूत्रे धारण केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की स्टेशनजवळ एक व्यापारी पेठ करता येणे शक्य आहे, म्हणून त्यांनी इ.स. १८९५ मध्ये शाहूपुरी वसाहत स्थापन करण्याची आज्ञा केली. १९२० पर्यत त्या वेळचे संस्थानचे इंजिनियर रावसाहेब विचारे व नगरपालिकेचे सुपरिटेंडेंट श्री भास्करराव जाधव यांनी ती आज्ञा पार पाडली. कोल्हापूरच्या आसपास ऊसाची लागवड करून गूळ तयार करण्याची पद्धत फार पूर्वीपासून होती. गेल्या शतकात व त्यांनतर देखील ऊसाची लागवड करणे वाढतच गेले. इ.स. १९०१ साली अदमासे १५ हजार एकरात ऊसाची लागवड होत होती. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर गूळ निर्माण केला जात असूनही कोल्हापूरला त्यावेळी गुळाची व्यापार पेठ नव्हती. कोकणात राजापूर व सांगलीला व्यापारी पेठेतून कोल्हापूरचा गूळ खपत असे. श्री शाहू महाराजांची गूळ व शेंग याचा व्यापार कोल्हापुरातच व्हावा ही महत्वकांक्षा होती, म्हणून त्यांनी आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना कोल्हापुरात यायचे आमंत्रण दिले. जे व्यापारी आले त्यांना विनामूल्य जागा देण्यात आल्या. एवढेच नव्हे तर करामध्येही सवलती देण्यात आल्या. शाहूपुरी पेठेचा इतिहास सुमारे ७० वर्षाचा आहे. एवढ्या अल्पावधीत जागा न राहिल्यामुळे अलिकडच्या काळात शहराबाहेर स्वतंत्र मार्केट यार्ड स्थापना करून गूळ बाजारपेठ हलवावी लागली. शाहूपुरी व्यापार पेठेमुळे कोल्हापूर शहराचा तसेच संस्थानचाही फार मोठा फायदा झाला. त्याचे सर्व श्रेय श्री शाहू छत्रपतींच्याकडे जाते.

गेल्या शतकात कोल्हापूरला शेक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रीय जीवनात मोठे महत्व आले. या कार्याचीही सुरूवात श्री शाहू छत्रपतींनीच केली. महाराष्ट्रातील ब्राह्मणेत्तर समाज मागासलेला असून शिक्षणाखेरीज त्यांची उन्नती होणार नाही हे दिसून आल्यावर त्यांनी कोल्हापूर संस्थानात आधुनिक पद्धतीच्या शिक्षण संस्था स्थापन करून मागासेलेल्या समाजातील सुशिक्षित तरूणांना संस्थानात नोकऱ्या देण्यास सुरूवात केली व त्याबरोबर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बहुजन समाजाच्या पायात अडकलेली धार्मिक बेडी तोडण्याचे प्रयत्न केले व सत्यशोधक चळवळीला पाठिंबा दिला. या सर्व गोष्टीमुळे बहुजन समाजात प्रचंड जागृती झाली. श्री शाहू महाराजांचे धोरण श्री राजाराम महाराजांनी तसेच पुढे चालू ठेवले. त्यामुळे हे दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र बनले. सध्या तर शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमुळे त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.

नव्या वसाहतींची वाढ
रेसिडेंसी जवळील ताराबाई पार्क वसाहतीनंतर शाहूपुरी वसाहत पूर्ण झाली. जुने शहर व जयंती नाल्यापर्यंत आलेली ही वसाहत यांच्या मध्ये असलेल्या खुल्या शेतीच्या जागी लक्ष्मीपुरी वसाहत निर्माण झाली. त्यावेळचे दिवाण बहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेली ही वसाहत सन १९२६ ते ३७ या काळात पूर्ण झाली. या वसाहतीनंतर देखील लोकांना जागा अपुरी पडू लागल्यावर इ.स. १९२९ साली राजारामपुरी वसाहत करण्यात आली. त्यानंतर १९३३ मध्ये राजारामपुरी व रेल्वे लाईन यांच्यामध्ये साई एक्स्टेंशनचा जन्म झाला. जसजशा नव्या वसाहती होत गेल्या तसतशा त्यांच्या निर्मितीत झालेले दोष सुधारत गेले. समाजाचे सर्व शिक्षण बहुधा प्रयत्न व प्रमाद या तत्वानेच होत असे.

शहराबाहेर नव्या वसाहती होत असतानाच वाढत्या लोकवस्तीच्या सोयीकरिता जुन्या शहरातील खुल्या जागेवर वसाहती होऊ लागल्या. त्यामध्ये शहरात मुख्यत: खासबाग, साकोली, वरुणतीर्र्थ (१९४४-४५), रावणेश्वर (१९४५), बेलबाग (१९४६), उद्यमनगर(१९४७), मस्कुती तलाव(१९५३) वगैरे ठिकाणी तळी बुजवून व शेतीच्या जमिनीत वसाहती निर्माण केल्या.

बऱ्याच कालावधीनंतर सन १९४१-४७ च्या दरम्यान रस्ते रूंदीचे काम मोठ्या प्रमाणावर केले गेले. यावेळी झालेले मुख्य रस्ते म्हणजे लक्ष्मीपुरी ते शेरीबाग, महाद्वार रोड-बिनखांबी गणेश मंदीर ते पाण्याचा खजिना यात वाढ व सुधारणा, श्री महालक्ष्मी देवालयासमोरील रस्ता, ताराबाई रोड, टेंबे रोड, सेंट्न्ल रोड(साठमारी ते रविवार पोलिस गेट), साठमारी ते राजारामपुरी, फिरंगाई रोड व कलेक्टर कचेरी ते शाहूपुरी (असेंब्ली रोड) याखेरीज या भागात या कालाल प्रथमच मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेेले कार्य म्हणजे भंगी पॅसेज. यामुळे शहरातील घाण कमी होऊन आरोग्य सुधारणा होण्यास मदत झाली.
पूर्वीच्या तुलनेत आत्ताचं कोल्हापूर खूपच विस्तारलं आहे. सर्वच बाजूंनी कोल्हापूर वेगाने वाढते आहे. नव्या वसाहतींची भर पडत आहे. रत्नाप्पा नगर, जरग नगर, साने गुरूजी वसाहत इत्यादीसारख्या अनेक वसाहती वसल्या आहेत. नजीकच्या कळंबा, फुलेवाडी, उचंगाव इ. अनेक ग्रामपंचायतीमध्ये व कोल्हापूर शहरामध्ये फरकच करता येऊ नये इतक्या त्या कोल्हापूर शहराशी एकरूप झालेल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. शासनाने तो तत्वत: मान्यही केलेला आहे. फक्त कायदेशीर स्वरूपच काय ते येण्याचे बाकी आहे. पण नजीकच्या काळात कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ ही अपरिहार्य गोष्ट आहे. अलिकडे झालेल्या कोल्हापूरच्या मास्टर प्लॅनमुळे शहरातील अनेक महत्वाच्या भागातील रस्ते रूंद करण्यात आलेले आहेत.