साठमारी :
साठमारी हा शब्द शहरात येणाऱ्या पाहुण्यांना अपरिचित आहे. साठमारी हा एक खेळ आहे. भारतात स्वातंत्र्यापूर्वी फारच थोड्या ठिकाणी हा खेळ खेळला जात असावा. कोल्हापूरात संस्थानकाळात हा खेळ खेळला जात असावा. परदेशात हल्ली देखील खेळल्या जाणाऱ्या बुल फाईट या खेळासारखाच पण त्याहूनही रोमांचकारी खेळ असून या खेळाचे स्वरूप असे की एक मोठा बंदिस्त आखाडा असे, या आखाड्यात काही अतंरावर संरक्षणाच्या दृष्टीने गोलाकार बुरुज (तटबंदी) असे. प्रत्येक तटबंदीला चार लहान दरवाजे असत. सर्व तटबंदीच्या भोवती खेळण्याला पुरेशी जागा असे.
खेळणारे वीर खेळाडू आखाड्यात उतरल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून आत एक हत्ती सोडण्यात येई. व ते दार पुन्हा बंद केले जाई. या बंदिस्त आखाड्यामध्ये खेळाडू व हत्ती यांचा खेळ सुरु होई. प्रत्येक खेळाडू हातातील भाल्याने हत्तीला टोचत. हत्ती अंगावर धावून आल्यावर खेळाडूने जवळच्या संरक्षित तटबंदीमध्ये घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे. संरक्षित तटबंदीचे दार लहान असल्यामुळे हत्ती आत जाऊ शकत नसे. इतक्या वेळेत दुसऱ्या बाजूने हत्तीला भाल्याने टोचायचे. हत्ती पहिल्याचा नाद सोडून देऊन दुसऱ्या खेळाडूच्या मागे धावे आणि जर का यदा कदाचित हत्तीने एखाद्या खेळाडूला पकडलेच तर त्याच्या सुटकेकरिता बाण व अप्पटबार (दारुकाम) घेऊन तयार असलेले लोक अप्पटबार उडवीत व बाण हत्तीच्या अंगावर सोडत. त्यामुळे हत्ती घाबरुन जाऊन पकडलेल्या व्यक्तीस सोडून देत असे. असा प्रयत्न होऊन देखील हत्तीच्या तावडीतून सुटू न शकल्यामुळे अनेक वीरांना आपले प्राण गमावले आहेत.
अशारीतीने स्वरक्षण करीत हत्तीला हैराण करून त्याच्याबरोबर खेळण्याचा हा अत्यंत धाडशी खेळ हजारो प्रेक्षक बंदिस्त आखाड्यासभोवताली उंचावर बसून पाहत असत. अशा वेळी या रोमांचकारी खेळातील वीरांचे मोठ्या औत्सुक्याने कौतुक केले जात असे. त्यांना इनामे देण्यात येत असत. अॅन्ड्न्युक्लिज अँड दि लायन या कथेतील वर्णनासारखे वातावरण निर्माण होई. त्याच वर्णनाशी मिळतीजुळती रचना त्यावेळी असे, परंतू त्या कथेत क्रुरता होती. पण येथे शूरता भरलेली असे.
हल्ली सुमारे गेल्या ७५ वर्षात असा खेळ कोल्हापूरात खेळला गेला नाही आणि यापुढेही खेळला जाणार नाही. तरी मंगळवार पेठेमध्ये शाहू स्टेडियम जवळच्या या साठमारी जवळ गेल्यावर त्या रोमांचकारी खेळाचे काल्पनिक चित्र डोळयासमोर उभे केले तरी अंगावर काटा उभारल्याखेरीज नाही. हल्ली या साठमारीचे काही नाममात्र अवशेषच पहावयास मिळतात.