किल्ले पन्हाळा



कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्ययनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात.

आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.
या किल्ल्याची माहिती इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात मिळते. त्याची साक्ष पांडवदरा, पोहाळे येथील लेणी आजही देतात. त्यानंतर हा किल्ला नाग जमातीच्या ताब्यात होता. पण पराशर ऋषींच्या कर्तृत्वामुळे आणि नागांच्या कीर्तीमुळे वास पन्नगालय (पन्नग = सर्प; आलय = घर) असे नाव प्राप्त झाले. सातवाहन काळाचे अवशेष येथे मिळतात.

यानंतर येथे राष्ट्न्कूट, चालुक्य, शिलाहार, भोज, यादव यांनी राज्य केले व इ. स. १०५२ मध्ये आज जसा किल्ला आपणास दिसतो तो शिलाहार वंशी राजा भोज दुसरा याने बांधला. याचे पूर्वीचे नाव ब्रह्मगिरी व नंतर मुसलमानी राजवटीत शहानबी दुर्ग. पुढे शिवरायांच्या काळात पन्हाळा हे नामाभिधान पुन्हा ठेवले.

किल्ला पन्हाळा प्रथम शिलाहार वंशी भोज राजा, शिलाहार नृसिंह याच्या कारकीर्दीत बांधण्यात आला. चालुक्य विक्रमादित्य पाचवा याच्या कालावधीत याची बहीण आक्कादेवी किशूकदू, तुरूगिरी (तोरगल) व म्हसवड या भागाचा कारभार चालवीत होती. या भागाची राजधानी त्यावेळी पन्हाळा ही होती. तसेच विजापूरकरांची पश्चिमेकडील हीच राजधानी होती.

हा किल्ला छत्रपती शिवरायांनी प्रथम तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजी घेतला. नंतर पुन्हा विजापूर अदिलशहाच्या ताब्यात गेला. पण लगेच २ मार्च १६६४ रोजी शिवरायांनी घेतला. याचवेळी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. याचवेळी शिवराय जोहरच्या हातावर तुरी देऊन विशाळगडी राजदिंडीतून गेले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे इ. स. १७१० मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली ती १७७२ पर्यंत येथेच होती. नंतर ती कोल्हापुरास रत्नाकर पंत दिवाण यांचे कारकीर्दीत गेली. पुढे १८८४ मध्ये हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. तेव्हाच प्रसिद्ध चार दरवाजा नेस्तनाबूत केला गेला. आज पन्हाळा हे हिलस्टेशन आहे. याच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न महाराष्ट्न् शासन, पन्हाळा नगरपालिका व नागरीक करीत आहेत.

या पन्हाळयावर अनेक ऐतिहासिक वास्तू आणि ऐतिहासिक महापुरूषांच्या जीवनाशी निगडीत अवशेष अस्तित्वात आहेत. कविवर्य मोरोपंतांचा जन्म येथेच झाला. त्यांच्या जन्मजागी आज मोरोपंत वाचनालयाची आधुनिक वास्तू उभी आहे. त्यालगतच थोड्या अंतरावर पन्हाळयाची प्रसिद्ध चवदार पाण्याची कापूरबांव नावाची विहीर, पुढे ऐतिहासिक काळातील महालक्ष्मी मंदिर आहे. भोवती जी सुंदर बाग आहे ती संध्या बाग (नेहरू उद्यान). त्यालगत हॉटेल रसना पर्यटकांच्या सेवेसाठी आहे.

आज ज्या वास्तूत नगरपालिका, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉईज होस्टेल आहे ती वास्तू ही शिवछत्रपतींच्या स्नुषा महाराणी ताराबाई यांचा वाडा. त्यासमोरचे हे शिवमंदीर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. यातील शिवछत्रपतींची अश्वारूढ प्रतिमा कागलचे श्री. सुतार यांनी बसविलेली आहे. ती १९९३ मध्ये बसविली आहे. थोड्याशा अंतरावर सज्जा कोठीची इमारत. पूर्वी या वास्तूचे नाव सदर ई महाल असे होते. या वास्तूत संभाजीराजांना पन्हाळा सुभ्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी ठेवले होते. इथेच त्यांची आणि शिवाजी महाराजांची अंतिम भेट झाली.

बाजीप्रभू बुरूजाजवळून तबक बागेत जाताना वैशिष्ट्यपूर्ण असा वाघ दरवाजा लागतो. या दरवाजावर टोपीधारक गणपती आहे.

इथून नजीकच आहे राजदिंडी ! याच मार्गाने शिवराय जोहारच्या वेढ्याच्या वेळी पन्हाळयावरून विशाळगडाला गेले. अगदी पश्चिमेला आहे पुसाटीचा बुरूज. त्याच्या पैल दिसते ते मसाईचे पठार. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील पांडवलेणी इथून सात मैलावर आहेत. इथून दिसणारा सूर्यास्त पहायला पर्यटकांची गर्दी असते.

गडावर तीन अंबरखाने, धान्याच्या कोठ्या अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. पूर्वीचा हा बालेकिल्ला.

तीन दरवाजाची भव्य वास्तू तीन मजली असून तिचे सर्व बांधकाम शिसे घालून केले आहे. त्यावर प्राचीन शिलालेख आहेत. दरवाजावरील नक्षीकाम भव्य आणि प्रेक्षणीय आहे. इ. स. १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच हा किल्ला अवघ्या साठ माणसानिशी घेतला. तेव्हा याच दरवाजात सोन्याची फुले उधळून शिवरायांचे स्वागत झाले. या तीन दरवाजालगतचे गोपाळतीर्थ हे पर्यटकांच्या विसाव्याचे ठिकाण आहे. लगतची घुमटी ही दारुखान्याची इमारत. या तीन दरवाजा नजीकच तीन मजली अंधारबाव नावाची विहीर आहे. तळात पाणी, मध्यभागी पटापैल जाणारी चोरवाट, वरील भागात राहणेसाठी जागा आहे. वास्तूवर एक शिलालेख आहे. या इमारतीस श्रीनगर असेही नांव आहे.

पराशर गुहा, कालीबुरूज, रेडेघाटीची बाग, समोरचा पावनगडचा परिसर या परिसरात प्राचीन अवशेष आहेत. या गडावर साधोबाचे तळे हे प्राचीन काळी पराशर तीर्थ या नावाने ख्यात होते. लगतचे अवशेष दिसतात ते चार दरवाजाचे. तो दरवाजा इंग्रजांनी १८४४ साली गडकरांच्या बंडात पाडला. जवळच बादशहाच्या करमणूकीसाठी राहणाऱ्या नायकिणींचे वास्तव्य असणारी नायकिणीचा सज्जा ही इमारत आहे. तेथे तीस नायकिणी राहत असत. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांचे मंदीर, त्यासमोर जिजाबाई सरकार यांचे मंदीर व लगतच्या पटांगणात रामचंद्र पंत अमात्य व त्यांच्या पत्नींची अशा दोन समाध्या आहेत. त्या बरोबर रेडेमहाल ही इमारत आहे. त्या जनावरांची सोय येथे होती. सध्या तेथे जनता बाजार आहे. पन्हाळयावरील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांपैकी सोभाळे तलाव व त्या काठी सोमेश्वर मंदीर आहे. या सोमेश्वरास शिवरायांनी सैनिकाकरवी लाख सोन्याची फुले वाहिल्याची नोंद जयरापिण्डे या कवीच्या पर्णालपर्वत ग्रहण अख्यान या काव्यात आहे.

असा निसर्गरम्य पन्हाळा एतिहासिक तसेच पर्यटकांसाठी थंड हवेचे ठिकाण आहे. मध्यमवर्गीय प्रवाशांकरिता हे खास शासनाने ठेवलेले पर्यटन केंद्र आहे. तेथे सरकारने १२ हॉलिडे होम्स् बांधली असून ३ कॉटेजीस आहेत. पन्हाळा गडावर पावसाळयात जोराचा पाऊस, धुके असले तरी, ऑक्टोबर ते जून पर्यंत अतिशय प्रसन्न वातावरण असते. असा पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्याच्या मर्मबंधातील ठेव आहे.