सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

महालक्ष्मी मंदिर संकुल...

महालक्ष्मी मंदिराचे गर्भगृह बांधले व पुढील राजवटींमध्ये हे मंदिर पूर्ण झाले, पण मंदिरस्थापत्य व मूर्ती प्रतिष्ठापन शास्त्रांचा आधार घेता वरील विधान तितकेसे संयुक्तिक वाटत नाही. शिवाय याला पुष्टी देणारे सबळ पुरावेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे मंदिर निर्माण कर्ता अजूनही अंधारातच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

महालक्ष्मी मंदिर समूह व त्याची एकंदर स्थिती विचारात घेता असे आढळून येईल की, हा त्रिकूट प्रासाद टेकडीवर वसलेला असावा. मंदिरापासून पश्चिमेकडे रंकाळा तलावापर्यंत जाणवण्याइतपत उतार आहे. शिवाय मुख्य त्रिकूट प्रासादाभोवतीची मंदिरे ही त्या मानाने खूपच खालच्या पातळीवर आहेत. महालक्ष्मी मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. (पूर्णत: पश्चिमेकडे नसून 50 ने वायव्येकडे तोंड करून आहे) नोव्हेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये सूर्यास्तावेळी सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या विग्रहावर काही काळ स्थिरावतात.

कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती सुप्रसिद्ध असे महालक्ष्मी मंदिर आहे. किंबहुना, आपण असे म्हणू शकतो की, कालांतराने महालक्ष्मी मंदिराभोवती वस्ती वाढल्याने हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती आले. प्राचीन कोल्हापूरसंबंधी विस्तृत माहिती देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे 'करवीरमाहात्म्य' कोल्हापूर आणि परिसरातील जवळजवळ सर्व देवता व त्यांच्या स्थानांची माहिती या ग्रंथात मिळते. या ग्रंथात प्रमुख वर्णन आढळते ते महालक्ष्मी व तिच्या विजयगाथांचे! करवीर महात्म्यानुसार महालक्ष्मीच सर्वाची जननी असल्याचे घोषित केलेले आहे. करवीरमाहात्म्य ग्रंथाच्या रचनेचा काळ मात्र अद्यापि वादाचा मुद्दा आहे. याच्या रचनेच्या काळासंदर्भात एकमत नाही. कोल्हापूरला 'कोल्हापूर' (मूळ नाव : कोल्लापूर) हे नाव कशामुळे मिळाले याची कथा 'करवीर माहात्म्यात' पाहायला मिळते. महालक्ष्मीने कोल्लासुराचा वध केला व त्याच्या प्रार्थनेवरून या क्षेत्राला 'कोल्लापूर' असे नाव प्राप्त झाले. भारतातील प्रमुख शक्तिपीठांमध्ये महालक्ष्मीचे पीठ म्हणजेच कोल्हापूर किंवा करवीरक्षेत्र हे प्रमुख आणि पूर्ण पीठ आहे. इथे महालक्ष्मीचे स्थानिक नाव 'अंबाबाई' आहे. कोणे एके काळी हे क्षेत्र तीर्थयात्रेचे प्रमुख केंद्र होते आणि त्यामुळेच याला 'दक्षिण काशी' असे नाव प्राप्त झाले. (या क्षेत्राची तुलना 'काशी' बरोबर केली जाते.)

महालक्ष्मी मंदिर कोणी बांधले, हा संशोधकांसमोर अद्यापि एक प्रश्नच आहे. या अनुषंगाने अनेक संशोधकांनी इतिहास व त्याच्या ताम्रपट, दस्तऐवज, शिलालेख यांसारख्या पुराव्यांच्या आधारे महालक्ष्मी मंदिर बांधणीच्या कालखंडाचा अभ्यास करून अनेक आडाखे बांधले आहेत. तसे पाहता, चालुक्या (बदामीचे) राजांनी महालक्ष्मी मंदिर बांधले अथवा बांधकामाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्या पुढील राजवटींनी हे बांधकाम पुढे वाढवले असा एक समज सर्वमान्य झाला आहे. इतिहास सांगतो की, शालिवाहन, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार (कल्याणी चालुक्यांचे मांडलिक व नंतर स्वतंत्र राजवट घोषित) यादव, बहामनी, मराठेशाही यांसारख्या सत्ता कोल्हापूरवर राज्य करून गेल्या; पण बदामीचे चालुक्य ते देवगिरीच्या यादवांपर्यंतच्या कोणत्या राजवटीत महालक्ष्मी मंदिर बांधले गेले याचा अजून मागमूस लागलेला नाही वा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही.

कोल्हापुरातच सापडलेल्या एका भग्न शिलालेखानुसार अशी माहिती मिळते की, परकीय आक्रमणे होण्याआधी महालक्ष्मी मंदिरावर स्वकियांनी हल्ला केला. दक्षिणेतील चोल राजांनी कल्याणी चालुक्यांच्या विरोधी मोहीम राबवून त्यांचे राज्य कोल्हापूरपर्यंत जिंकून घेतले. या विजयोन्मादात त्यांनी महालक्ष्मी मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला. या नुकसानीतून मंदिराचे रक्षण व्हावे यासाठी कोणी मुथ्थैय्या नामक लढवय्याने आपले प्राण गमावले. कालगणनेनुसार ही घटना अकराव्या शतकात घडली, असा अनुमान निघतो. या सर्व वर्णनातून एक गोष्ट स्पष्टच प्रतीत होते की, जर महालक्ष्मी मंदिर जाळण्याचा प्रयत्न झाला होता, त्या अर्थी ते त्या काळी लाकडाचे (पूर्णत: वा अंशत:) होते. म्हणून आपल्याला असा अंदाज बांधण्यास काही हरकत नाही की, सध्या दृश्यमान असलेले महालक्ष्मी मंदिर हे कल्याणी चालुक्यांच्या राजवटीत बांधले गेले असावे.

डॉ. मिराशी जे शिलाहार राजवंशाच्या इतिहासाचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या मते, महालक्ष्मीचे मंदिर हे शिलाहार राजवटीच्याही आधीचे असून कदाचित ते 'िंसद' राजवटीत बांधले गेले असावे. या सिंद राजांनी (करहाटपुराधीश्वर) कोल्हापूर-कराड या भागावर काही काळ राज्य केले) आणि शिलाहारांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा. कोल्हापूरचे शिलाहार हे जरी 'महालक्ष्मीलब्धवरप्रसाद' असे बिरुद धारण करणारे असले तरी बहुतकरून या राजवटीत स्यादवादाला (जैनमत) प्राधान्य होते.

महालक्ष्मी मंदिर प्रकारात चार जैन द्वारपालांच्या मूर्ती आढळतात. त्यातील दोन मूर्ती महाकाली मंदिराच्या उपमंदिरामध्ये 'भरत' आणि 'शत्रुघ्न' या नावाने विराजमान आहेत, तर उर्वरित दोन सभामंडपाच्या प्रवेशिकेच्या दोन्ही अंगास कोनाडय़ांमध्ये स्थित आहेत. काही संशोधकांच्या मते, पूर्व चालुक्यांनी (बदामीचे चालुक्य) फक्त