दख्खनचा राजा श्री जोतिबा



दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्द असलेल्या करवीरपीठास धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे. दख्खनचा राजा श्री जोतिबा, श्री कात्यायनी देवी, नृसिंहवाडी येथील श्रीक्षेत्र दत्तात्रय मंदीर, बाहुबली येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र, त्याचप्रमाणे विशाळगड दर्गा आदि धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लोकिक त्रिखंडात झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरास अलोकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे. या धर्मस्थळांपैकी वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्नचे लोकदैवत म्हणून प्रसिध्द आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या जोतिबा डोगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक व ऐहिक एैश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे.

स्थान माहात्म्य व पूर्वपीठिका :डोंगरावरील उंच-सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून, सुमारे ५ हजार लोकवस्तीच्या या गावात ९९% लोक गुरव समाजाचे आहेत. देवताकृत्य तसेच नारळ, गुलाल व मेवामिठाईची दुकाने यावरच त्यांची गुजराण होते.

वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी. वर आहे. सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच जोतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदीर आहे.

श्री जोतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच जोतिबा किंवा केदारनाथ ! जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा जोतिबा !

पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता. त्यानी तपश्चर्या करून बद्रिनाथांना संतुष्ट केले. बद्रिनाथांनी पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुध्द षष्ठीच्या मुहूर्तावर स्वत: आठ वर्षाची बालमूर्ती होऊन बद्रिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमूर्ती बद्रिनाथांची प्राणज्योती ! म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती, त्याप्रमाणे तिच्या आंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली, तेच जोतिबाचे रूप होय. श्री जोतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारका प्रिय ! त्याच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे.

मंदिराचा पूर्वेतिहास:

श्री जोतिबाचे आज जे मोठे मंदीर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. मूळ मंदीर कराड जवळच्या किवळ येथील रावजी नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे जे देवालय आहे ते इ. स. १७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले. मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.

दुसरे केदारेश्वराचे देवालय. विशेष म्हणचे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे. हे मंदीर इ,स. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले. केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पटांबा म्हणजेच चोपडाईचे देवालय आहे. इ.स. १७५० मध्ये प्रीतीराव चव्हाण (हिम्मतबहादूर) यांनी बांधले. या तीन देवळांचा एक गट होतो. चौथे सामाश्वरीचे देवालय. हे इ.स.१७८० मध्ये मालजी निकम, पन्हाळकर यांनी बांधले.