सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

बाळूमामांचे आदमापूर श्री क्षेत्र आदमापूर येथे भव्य मंदिर, धर्मशाळा, प्रसाद हॉल अशा वास्तू उभ्या राहिल्या आहेत. रविवार, अमावस्या, पौर्णिमेस येथे भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होवू लागली आहे. देवस्थानचे बकर्‍यांचे कळप देवमामांची बकरी म्हणून महाराष्ट्र-कर्नाटकात सर्वत्र फिरत आहेत. ही देवमामांची बकरी आपल्या शेतात बसावीत म्हणून लोक श्रध्देने आग्रह करत असतात. बाळूमामांच्या नावावर चित्रपट, व्हीडीओ फिल्म्स, गीतांच्या कॅसेट, सिडीज निघाल्या असून या सर्वामुळे आदमापूर क्षेत्राच्या प्रसिध्दीस हातभारच लागला आहे. आदमापूरची तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्दी वाढू लागल्याने येथे येणार्‍या भाविकांच्या संख्येतही झपाटय़ाने वाढ होवू लागली आहे. त्यामुळे या परिसराच्या अर्थव्यवस्थेवरही याचा सुपरिणाम होत आहे. शिर्डीजवळील शनिशिंगणापूरसारखे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला येणारे भक्त आता आदमापूरला भेट देवू लागले आहेत.