सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

अश्मयुगीन खजिना : चक्रेश्वर

चक्रेश्वरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील भोगावती साखर कारखान्यानजीकचे एक छोटे व दुर्लक्षित खेडेगाव. आज या गावात अश्मयुगीन संस्कृती, इ.पू. पहिले शतक ते इ.स. 8 वे शतक आणि 12व्या ते 14व्या शतकातील यादव काळ अशा मानवी इतिहासातील तीन महत्वपूर्ण टप्प्यांतील अवशेष आढळल्याने प्रसिध्दीस येत आहे. येथे पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या शिवलिंगाच्या उत्क्रांतीतील सुरुवातीचे सयोनी शिवलिंग, मानुषलिंगयुक्त शिवलिंग, मुखलिंग असे सर्व प्रकार तसेच पंचसुत्री, त्रिसुत्री आणि सर्वतोभद्र असे परंपरेनुसार दिसणारे प्रकार आढळले आहेत. त्यामुळे हा परिसर म्हणजे तंत्रमार्गी शैव सांप्रदाय कापालीक काळातील असावा असे मत अभ्यासकांनी मांडले आहे.
चक्रेश्वरवाडी गाव, येथील शिलावतरुळाची टेकडी आणि तपसा हे क्षेत्र असा दोन अडीच कि.मी.चा परिसर म्हणजे अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासू पर्यटकांसाठी मोठा खजिना आहे. शिला वतरुळाच्या टेकडीवर पश्चिम बाजूच्या परिसरात विशिष्ट टप्प्यावर शिलावतरुळे असलेले असंख्य पाषाण आहेत. टेकडीवरील शिलावतरुळे किंवा क्षितीजवतरुळ म्हणजे अश्मयुगीन सामुहिक दफनभूमी असण्याची शक्यता आहे. या शिलावतरुळातून अवकाशाच्या अद्भूत आणि विराट दर्शनाची अनुभूती घेण्यासारखीच आहे.