सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

लक्ष्मीसेन मठाला दोन हजार वर्षाचा इतिहास

कोल्हापूर : जैन संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक लक्ष्मीसेन मठाने दोन हजार वर्षाची परंपरा जोपासली आहे. शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन महास्वामींच्या मठातील आदिनाथ तीर्थकरांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सुवर्णमहोत्सव वर्षभर विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. अशा मठाला दोन हजार वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे.

दोन हजार वषार्र्पूर्वीचे गौरवशाली प्रवेशद्वार ऐतिहासिक वास्तुशिल्पाचा सुंदर आविष्कार आहे. जोतिबा डोंगर भागातील पाषाणांचा वापर या प्रवेशद्वारासाठी करण्यात आला आहे. भवानी मंडप प्रवेशद्वाराशी साधम्र्य असलेल्या या प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना नगारखाने आहेत. येथे हत्तींचे वास्तव्य असताना हत्तींचे मंगलमय स्वागत करून सलामी देण्यासाठी नगारे वाजवले जात होते. लक्ष्मीसेन मठाच्या मध्यभागी असणारा श्री चंद्रप्रभ तीर्थकरांचा मानस्तंभ कलेचा सुंदर नमुना आहे. या मानस्तंभाची अखंड 41

फुटांतील मूर्तीची उभी रचना करण्यात आली आहे. या दगडास आकार देण्याचे काम केसापूर पेठेचे मुस्लिम कारागीर याकूब मुल्ला यांनी केले आहे. या मानस्तंभाच्या चारी बाजूंना चतुमरुख मूलनायक श्री चंद्रप्रभ तीर्थकारांच्या मूर्ती विराजमान आहेत. आचार्य विद्यानंद महाराज यांच्या पावन उपस्थितीत या

मानस्तंभाची 1983 मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री चंद्रप्रभ दिगंबर जिनमठातील चंद्रप्रभ तीर्थकरांची तीन फुटी बैठी मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. तसेच भगवान 1008 श्री आदिनाथ तीर्थकर यांची मठामधील 28 फुटी मूर्ती अखंड अमृतशिलापासून तयार करण्यात आली असून, मूर्ती बनवण्यासाठी लागणारा अमृतशिला 1958 मध्ये राजस्थान येथून आणण्यात आला होती. मूर्ती रेल्वेने कोल्हापुरात आणण्यात आली. मठात आणण्यासाठी खास लाकडी गाडा तयार करण्यात आला होता. या मूर्तीची स्थापना 1962 मध्ये लक्ष्मीसेन जैन मठात करण्यात आली.

अनेक दानशूर, जैन श्रवक यांच्या देणगीतून येथे प्रशस्त जैन भवन बांधण्यात आले आहे. येथे अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येतात. येथे बाहेरगावाहून येणार्‍या जैन श्रवक-श्रविकांची राहण्याची सोय केली जाते. मठाच्या जुन्या इमारतीत स्वामीजींचे निवास्थान असून येथे धर्म आज्ञा दिल्या जातात. अकबर राजाच्या राज्यकारभारात मठात दिगंबर अवस्थाधारण साधूंची मठ संस्थान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; मात्र धर्मप्रसारासाठी करावा लागणारा प्रवास त्यांना शक्य नसल्याने भगवे वस्त्र परिधान केलेल्या श्री लक्ष्मीसेन महास्वामींची मठाधिपती म्हणून नियुक्ती करण्यात आली.