सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

रंकाळा तलाव- 1

कोल्हापुरातले पर्यटकांचे आवडते प्रेक्षणीय स्थळ म्हणून रंकाळा तलावाचे महत्त्व आहे. या रमणीय ठिकाणी संध्याकाळी कोल्हापुरातील बहुसंख्य नागरिक व कोल्हापुरात आलेले पर्यटक मोठय़ा संख्येने फिरावयास गर्दी करतात. रंकाळा ही कोल्हापुरच्या प्राचीन सहा वसाहतींपैकी एक स्वतंत्र वसाहत होती. रंकाळा तलावाचा घेर अडीच मैलांचा असून त्याची मध्यभागी खोली 35फूट आहे. आजच्या रंकाळा तलावाच्या जागी पूर्वी एक भली मोठी दगडाची खाण होती. या खाणीतूनच महालक्ष्मी मंदिरासाठी व राजा गंडरादित्य याने जी 360 जैन मंदिरे बांधली त्यासाठी दगडाचा पुरवठा करण्यात आला होता. आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या

भूकंपामुळे या खाणीचा विस्तार होवून ती पाण्याने भरून गेली. पुढे याचेच रूपांतर तलावात झाले. कालांतराने पाणी पुरवठय़ाच्या निमित्ताने यामध्ये दक्षिणेकडील दोन ओढय़ांचे पाणी सोडण्यात आले. 1883 मध्ये गावाकडच्या बाजूला उत्तम दगडी बांध बांधल्यामुळे तलावातील पाणी साठा वाढून तलावाला शोभा आली. तलावाला सुरेख घाट बांधून, बंधार्‍यावर फिरण्यासाठी सुंदर रस्ता तयार केल्याने व टॉवर उभा केल्याने तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

रंकाळ्य़ाचा पदपथ, शालिनी पॅलेसची देखणी इमारत, रंकाळ्य़ाच्या बाजूंनी असलेली विविध उद्याने, खाद्यपदार्थाची रेलचेल असलेल्या असंख्य गाडय़ा, रंकाळ्य़ातील बोटींग, लहान मुलांना आकर्षित करणारी मिनी ट्रेन, झुले, घसरगुंडय़ा, फेरफटक्यासाठी देखणे घोडे इ. विविध आकर्षणे व सोबत उत्साहवर्धक वातावरण, नयनरम्य निसर्ग यामुळे सायंकाळच्या फेरफटक्यासाठी कोल्हापुरात रंकाळा अव्वल स्थानावर आहे.

रंकभैरव या शंकराचा अवतार समजल्या गेलेल्या व महालक्ष्मीच्या मर्जीतल्या देवाचे नाव या तलावाला देण्यात आलेले आहे. रंकाळ्य़ाच्या पूर्वेस पाण्यात असलेली संध्यामठ ही हेमांडपंथी बांधणीची प्राचीन वास्तू चित्रकारांचे आकर्षण आहे. रंकाळ्य़ाचे कोल्हापुरकरांशी जिव्हाळ्य़ाचे नाते असल्याने महानगरपालिका गेली कित्येक वर्षे पर्यटनाला प्रोत्साहीत करण्यासाठी रंकाळा महोत्सवाचे आयोजन करीत आहे. एकूणच कोल्हापुरच्या पर्यटनात रंकाळ्य़ाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.