सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

>

कणेरीमठाचे प्रेक्षणीय ग्रामीण म्युझियम
कोल्हापुरच्या दक्षिणेला 15 कि.मी. अंतरावर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीजवळ असलेला कन्हेरी गावाच्या टेकडीवर असलेला लिंगायत धर्मीयांचा प्राचीन सिद्धगिरीमठ प्रसिद्ध आहे. हा मठ लिंगायताच्या पाच जगद्गुरूपैकी एका जगद्गुरूंचे सिंहासन म्हणून ओळखला जातो. काडसिद्धेश्वर या 12 व्या शतकात होवून गेलेल्या मूळ पुरूषांवरून येथील मठाधिशांना 'काडसिद्धेश्वर स्वामी' म्हणतात. लिंगायतांच्यात या मठाचे मोठे माहात्म्य असून याचे भक्तगण देशभर पसरलेले आहेत. मठाभोवती उंच दगडी भिंत असून आतमध्ये सिद्धेश्वराचे मुख्य मंदिर व भोवताली अडकेश्वर, चक्रेश्वर, रूद्रपाल यांची देवळे आहेत. मठाचा परिसर अत्यंत रमणीय असून शालेय सहलींसाठी येथे नेहमी गर्दी असते. अलीकडे येथे नव्याने उभारण्यात आलेले 'श्री सिद्धगिरी म्युझियम ऑफ व्हिलेज लाइफ' हे ग्रामीण संग्रहालय म्हणजे करवीर नगरीत येणार्‍या पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षणाचे झाले आहे. हे म्युझियम म्हणजे 50 एकर जागेत असलेले भारताच्या ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब दाखवणारे एक छोटे खेडेच आहे.

शेतात सुरू असलेल्या मशागतीपासून ते खळ्य़ावरच्या मळणीपर्यंत.. अन् आडावरून पाणी ओढणार्‍या ग्रामीण स्त्री पासून ते गावातील धनगर, कुंभार, चांभार, सुतार अशा वेगवेगळ्य़ा बलुतेदारांच्या व्यवसायाचे अगदी हुबेहूब चित्रण करणारे शिल्पग्राम येथे साकारले आहे. भारतीय ग्रामीण राहणीमान डोळ्य़ासमोर उभे करणारे हे म्युझियम कोल्हापुरच्या पर्यटनाचे नवे दालनच आहे. या संग्रहालयासाठी प्रवेश शुल्क आहे.